Tuesday, 10 June 2025

मिशन टिकली



 ‘टिकली’ तर टिकली, ती ही टिकली! 

साधारण ३० वर्षांपूर्वीची ही गोष्टं आहे, माझ्या आयुष्यात जे घडले ते आज तुमच्या बरोबर शेयर करते. मी ज्या शाळेत होते ती एक ख्रिश्चन मिशनरी शाळा आहे, अत्यंत प्रतिष्ठित, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण तेव्हा देत असे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नं करत असे. तेव्हा फारशा शाळा नव्हत्याच मुळात, ही घराजवळ होती आणि माझे वडील ही ह्याच शाळेत मराठी भाषेचे शिक्षक होते, त्यामुळे सोयीची होती. पण शाळेतील काही नियम—देशाबाहेरील मिशनरी संस्थांकडून आलेले असावेत कदाचित— तदापी ते स्वीकारणे जरा आम्हाला कठीण जात असे. त्यापैकी एक नियम म्हणजे मुलींना कपाळावर टिकली लावण्यास मनाई! तशी ही शाळा सर्व धर्मांच्या आणि जातींच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती, त्यामुळे हा नियम विद्यार्थी आणि काही शिक्षकांना मान्य नव्हता. इतर काही मुली आणि मी एकत्र आलो, आम्हाला काही शिक्षकांचा पाठिंबा होताच, आणि एकत्रितपणे आम्ही या नियमाविरुद्ध तटस्थ उभं राहिलो. बंदी असूनही आम्ही कपाळावर रोज टिकली लावली, काहींनी गोलाकारात गंध लावला, अगदी निर्भयपणे. असे बरेच आठवडे गेलेत. मी तेव्हा लहान होते, त्यामुळे वरच्या एडमिनिस्ट्रेशन मधे नक्की काय घडलं ते अर्थातच मला काही उमगले नाही, किंबहुना चर्चा झाल्या असाव्यात, आणि अखेरीस ह्या नियमाचा फडशा पाडण्यात आला. त्यानंतरच्या काळात मात्र आम्हाला पुन्हा टिकली लावण्यास कोणीही मज्जाव केला नाही.

मी टिकलीला जशी चिकटले तशीच टिकलीही माझ्यावर टिकून राहिली. माझ्या आयुषात संकल्परूपी टिकली प्रतीकात्मक ठरली—असा संकल्प जो योग्य आहे आणि जो कुठल्याही परिस्थितीत पूर्णत्वास न्यायाचा.

मी दहावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले, तेव्हा शाळा सुटली आणि पुढे मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको कॉलेजमध्ये विज्ञान शाखा निवडली. माझ्या शाळेतील बहुतेक मैत्रिणींनी कॉमर्स घेतलं होतं, त्यामुळे मी येथे एकटी पडले होते, एका वेगळ्याच वाटेवर. बारावी जेमतेम पास झाले आणि पुढे मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्याच आरवायके सायन्स कॉलेज मधे बॅचलर ऑफ सायन्स च्या डिग्री साठी प्रवेश घेतला. कालांतराने मला मायक्रोबायोलॉजी विषय खूपच आवडू लागला, श्रेय अर्थात त्या काळातील शिक्षकांनाच आणि वाचनालयातील पुस्तकांना जाते. पदवी घेत असतानाच्या शेवटच्या वर्षी माझ्या वडिलांना एक असाध्य आजार झाला. त्याच काळात पुणे विद्यापीठात मायक्रोबायोलॉजी विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी पहिल्याच गुणवत्ता यादीत माझे नाव झळकले. मात्र घरच्यांचे म्हणणे होते की मी 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत पुढील शिक्षण घ्यावे. माझ्या कुटुंबाचे आर्थिक गणित वडिलांच्या उपचारां भोवती फिरत असल्याकारणाने विस्कळीत झाले होते, त्यामुळे पुण्यात शिक्षण घेणं तेव्हा आव्हानात्मक होतं. ठरल्यानुसार, मी विद्यापीठाच्या 'कमवा आणि शिका' योजनेत नाव नोंदवलं. मास्टर्स इन मायक्रोबायोलॉजी च्या पहिल्या वर्षी मी परदेशी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र विभागात सहाय्यक म्हणून काम केलं. दुसऱ्या वर्षी मुलींच्या मेसमध्ये टोकन वाटपाचं काम केलं. मला तासाला १५ रुपये मिळत असे. या पैशात दोन वेळचं जेवण एडजस्ट झाले, पण नाश्ता एडजस्ट होऊ शकला नाही. रविवारी मेसमध्ये फीस्ट असल्याकारणाने रात्रीचं जेवण नसायचं, तेव्हा मी एक तर ५ रुपयांचा वडापाव किवा पार्ले बिस्किट खायची किंवा कधी कधी उपाशीच झोपत असे. मित्र-मैत्रिणींनो, मी काही UPSC किंवा MPSC ची तयारी करत नव्हते, म्हणून माझ्या आयुष्यातील या संघर्षांविषयी पुस्तक लिहिण्याचं कधीच मनात आलं नव्हतं. पण हाच संघर्ष पुढे Ph.D.च्या दरम्यानही सुरूच राहिला. डॉक्टर ऑफ फिलोसोफी साठी मी माझा आवडीचाच विषय निवडला, पण त्याला कुठला निधी किवा आर्थिक पाठबळ नव्हते आणि पितृछत्र हरपून परिस्थितीच्या झळांचा सामना करावा लागला. म्हणूनच मी, मांजरी-हडपसरमधील एका नामांकित कॉलेज मधे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलं आणि Ph.D. पूर्ण केली. पीएचडी मधील माझ्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी भारत सरकारच्या IAMM ने मला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. आर्थिक कोंडी होतीच त्यामुळे मी लागलीच गोखले एजुकेशन सोसाइटीच्या कॉलेज मधे प्राध्यापिकेची भूमिका स्वीकारली आणि तेव्हापासून आजही वर्गातील माझ्या प्रत्येक तासाचे मी सिंहावलोकन करतेच व स्वतःत सुधारणाही घडून आणते. हीच निष्ठा आणि ह्या प्रामाणिकपणामुळे कोविड च्या काळात मी आणि माझ्या टीम ने एक लाख ४० हजार रुग्णांचे सैंपलच्या चाचण्या बिनचूक करून दिल्यात. २४ तासात रिपोर्टिंग झाल्याकारणाने, रुग्णांवर उपचारही पटकन होऊ शकले, अनेकांचे प्राण वाचलेत. मार्ग तसा अवघड होता पण त्यात अचूकता होती, “because harder right was always preferred over easier wrong”.

तरीही, आजूबाजूचे अनेक लोकं सहज आणि चुकीचे मार्ग निवडून आयुष्यात स्थिर आणि ‘यशस्वी’ झालेले मी पाहिलं, आजही पाहते आहे. पण या सगळ्या अनुभवांमधून मी एक महत्त्वाचा धडा घेतला- सहज-सोपं आयुष्य कुणालाही मिळू शकतं, पण अर्थपूर्ण आयुष्य धाडसातून उभं राहतं. मी जे निवडलं ते सोपं नव्हतं—पण ते मूल्याधिष्ठित होतं, स्वाभिमानाने भरलेलं होतं, आणि खऱ्या अर्थाने ते "माझं" होतं. यातून बरच शिकायला मिळाले, जे आता मला शिकवताना ही कामी येतय. 

कठीण वाट निवडल्यामुळे आयुष्यही सतत संघर्षांच्या आणि कठीण प्रसंगांच्या लाटांवर हेलकावे खात राहणार, हेही तितकेच खरे! कपाळावरच्या टिकलीचा संघर्षाचा प्रवास काही संपला नाही, न झुकता माझ्याबरोबर ती ही ठामपणे उभी आहे, माझ्या अस्थित्वेची जाणीव करून देणारी ती सहचर आहे.

22 comments:

  1. सुंदर लिहिलंय.
    अवघड अनवट वाटेवरच स्वप्नांचा गाव असतो.
    सलाम. शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. वेळ काढून लेख वाचला आणि अभिप्राय दिला, धन्यवाद सत्यजित! means a lot 🙏

      Delete
  2. Aparna Mathakari11 June 2025 at 01:45

    टिकलीपासून सुरू झालेला हा प्रवास स्वाभिमान, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अमोघ साक्षात्कार आहे. प्रेरणादायी आणि ठाम!

    ReplyDelete
    Replies
    1. मीनल भारी होते दिवस! खूप आठवतात 🫶🏻

      Delete
  3. Very inspirational story! Keep going and keep sharing! You write very well both in Marathi as well as English! Kudos!

    ReplyDelete
  4. Sundar lihile ahe tai, jevha pasun tula olkhayla lagle tevha pasun tu fakt ek yashasvi vyakti mhanunach mahiti hote, tya magcha sangharsh pan kalala proud of you dear Swati tai

    ReplyDelete
  5. Swarali Choughule11 June 2025 at 02:54

    Your Writing are always inspiring.. Very Rightly said " harder right is always preferred over easier wrong".. following the same... ✨❤️

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks my girl! I am sure Swara, I know you as a very empathetic person and that’s why you are my favourite!

      Delete
  6. Sundar vrutant..ani jeevanatlya eka prasanga pasun khoop kahi shikun jopasun ek katheen ayushya sahaj dhadsane jagnyachi prerna ahe hee .. loved to see you peel another layer of your life and having the courage to share it with us..Kudos!!

    ReplyDelete
  7. Ma'am, your words are filled with life, emotion, and hope. This story will stay with me for a long time. It touched me deeply and feels motivated. 🌷✨

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much 🫶🏻 and stay blessed in this journey called life!

      Delete
  8. मला तुझा खूप अभिमान वाटतो.

    ReplyDelete
  9. सुंदर! खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा 👍

    ReplyDelete
  10. Your story was heart touching madam!!🙏

    ReplyDelete
  11. Reading your post gave me goosebumps. I know the kind of struggles you’ve been through, and got to know some more today. Seeing how you’ve turned all that pain into strength—and now into something so meaningful—fills me with pride. Keep inspiring ❤️

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks my dear 🫶🏻 you are a part and parcel of everything in my life! Love you

      Delete