आज आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मी लवकर उठून स्नान आणि योगा केला. अंगणात सडा टाकून कोल्हम रांगोळी काढली. देवपूजा करून आम्ही फराळ बनवले. आईने माझ्या आवडीचा खुसखुशीत फराळी चिवडा घरीच बनवला होता. तो चिवडा खात असताना मला आईबद्दल काय वाटतं, हे आज मी तिला सांगितलं. माझी आई म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून तिचा स्वभाव प्रेमात पडावा असाच आहे. दुसऱ्याचा विचार करणारी, त्यांचं म्हणणं शांतपणे आणि एकचित्ताने ऐकून घेऊन मग योग्य तोच सल्ला देणारी. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारी, आणि बोलायचंच असेल तर फार विचारपूर्वक शब्दांची निवड करणारी. दुसऱ्याची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव टिपून पुढील संवाद-सूत्र ठरवणारी. एखादा जर फार नकारात्मक दृष्टिकोन घेऊन आला असेल, तर आई त्याला सकारात्मक बाजू दाखवत असे. आईचं म्हणणं किंवा निष्कर्ष कधीच दुसऱ्यांच्या म्हणण्यावर अवलंबून नसते. तिचं विश्लेषणात्मक कौशल्य, म्हणजेच माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता, जबरदस्त आहे. त्यात संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञानाची अचूक जोड तिला लाभली आहे. हे विश्लेषणात्मक कौशल्य आईला व्यवहारात, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधात, आर्थिक, सामाजिक आणि इतर अनेक बाबतीत मदतीचं ठरतं. आईचं हे कौशल्य इतकं विकसित होण्यामागे लहानपणापासूनची वाचनाची आवड, तारुण्यात घरातील व्यवसायाचे अकाउंट्स सांभाळण्याची मिळालेली संधी आणि नोकरीतील क्वालिटी व ऑडिटचा बक्कळ अनुभव हे सर्व कारणीभूत आहेत. आयुष्यात आलेल्या अडचणी आणि काही कटू अनुभवांमुळे तिच्यात दूरदृष्टी आणि तार्किक विचारपद्धती रूजली गेली आहे. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून तिचा सर्वांगीण विकास उत्कृष्टरीत्या झालेला आहे. याची मला जाणीव आहे आणि त्याचा अभिमानही वाटतो. जसे आपण आपल्या सहकाऱ्यांची आणि वरिष्ठांची कधीतरी प्रशंसा करतो, स्तुती करतो, कधी एखाद्या कार्यासाठी मदत व्हावी म्हणून विनंती करतो आणि गरज पडल्यास, काही चुकल्यास माफीही मागतो, तशीच प्रशंसा आपण आपल्या आई-वडिलांची, जोडीदारांची किंवा मुलांचीही कधी करून पहावी. ते आनंदी तर होतीलच, पण त्यांना पुढील आयुष्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल. आज मी मनातलं आईला सांगितल्यानंतर ती स्मितहसली. काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांत, हावभावांत तिला झालेला आनंद आणि समाधान मला दिसलं आणि ते मौल्यवान वाटलं. आई जास्त बोलत नाही, पण तिच्या कृतीतून शिकायला तर नक्कीच मिळतं… आणि आधारही मिळतो. म्हणूनच आज वारकऱ्यांना पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळाल्यावर जो विलक्षण आनंद होईल तशीच काहीशी अनुभूती मला मिळाली आहे.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया,
चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा,
बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलों देवा,
तुका म्हणे आता खेळतो कौतूके, जालें तुझे सुख अंतर्बाही ।।
जय हरी विठ्ठल!
विठू माऊली… माऊली विठू ।।