ती एकटीच आहे- ती कुठे काय करते.
मी फार गोंधळले, प्रशंसा केली म्हणुन थैंक्यू म्हणावे की क्षणात माझे अस्थित्व नाहिसे झाले म्हणुन हळहळ व्यक्त करावी, हे कळले नाही. तेवढ्यापुरते मी हसुन टाळले, ती गेल्यानंतर माझा संताप झाला पण नंतर लिहून भावना व्यक्त करण्याचे ठरवले!
माझे मुल्यमापन करणारी ती कोण! मी एकटीच म्हणुन मी काही करत नाही, हा तर्क लावणारी ती कोण! माझा लढा मीच देते आहे व वेळ काढून माझ्या छोट्या मोठ्या ईच्छा पुर्ण करते. दोन वेळचे ताजे जेवण ही प्रत्येकाची गरज असते, त्यासाठी लागणारी सर्व सामग्री मी स्वतः बाजारातून आणते, अगदी नेहमीचे फळं-भाजीपाल्यापासुन ते किराणा ईत्यादी समानापर्यंत. मला ही रहायला घर हवे असते ज्याचे वीजबील, पाणीबील, घरपट्टी, छोटे-मोठे सर्व मेंटेनेंस, बँकेतील, पोस्टातील, ईतर ऑफिशीयल सर्व कामे मी करते, कुठलेही मानसीक पाठबळ किंवा मनुष्यबळ नसताना. हे सगळे काही करुन मी बाकिच्यांसाठी अडल्यानडल्यावेळी हजर असते, तत्पर असते मदतीसाठी मारलेल्या प्रत्येक हाकेला ‘ओ’ देण्यास. ‘कमवा आणि शिका’ अंतर्गत केलेल्या माझ्या शिक्षणापासुन ते नोकरी करताना व वैयक्तिक आयुष्यात आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्यापर्यंत, अगदी आजही खंबीरपणे कोणाचीही मदत न घेता, मी माझी नौका जोमाने पुढे नेत आहे. उगवणारा प्रत्येक दिवस चैलेंजेज घेऊन आलेला असतो. माझे यश आणि अपयश दोन्ही ही मीच खंबीरपणे हाताळते आहे. घरात कधी प्लंबर होते तर कधी इलेक्ट्रिशियन होते तर कधी भिंतीमधील बारिक खड्डे बुजवणारी गवंडी होते तर कधी भितींवरील तेलाच्या डागावर पैचवर्क करणारी रंगारी होते. कधी कोर्टात १५ चकरा मारुन, लोनमुळे अडकलेले घराचे कागदपत्र सोडवुन आणते तर कधी सात-बारा मिळवण्याची किचकट प्रोसेस पुर्ण करते. आजारपणात एकटी जाऊन डॉक्टरला तब्येत दाखवुन येते तर कधी गरज पडल्यास अैडमीटही होते. माझे आयुष्य मी आनंदाने व शर्तीने जगते आहे, माझी कुठली ही कंपलेंट नाही, मी मुळीच खचणार नाही आणि रडतही बसणार नाही. आश्चर्य व खेद याबद्दल वाटते की आज एकाच समाजात राहुनही एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे अस्तित्व कसे नाकारु शकते, तिला ही अशी वागणुक कशी देऊ शकते, विनाकारण तिचा पानउतारा कशी करु शकते, मन धजावते तरी कसे, हे म्हणतांना की ‘ती तर एकटीच आहे- ती कुठे काय करते!’
-‘अ सिंगल वुमन’