Thursday, 26 February 2026

दव




एका साहित्यकाच्या घरात जन्माला येणे म्हणजे भरून आलेले आभाळ आणि त्याला प्रकाशाची किनार…

सतत श्रावण मास असल्याचा भास किंवा वसंत ऋतू च्या आगमाची आस. 

कवी कल्पनाशक्तीच्या शिखरावर असताना, किराण्याची यादी हातात मिळावी तसे घरातील ऋतू रंग बदलत असत.

व्यवहारी जग आणि आतील कवी मनाची तडजोड मला काही नवीन नव्हती. अशा सुखद भावनात्मक संघर्षाच्या वातावरणात मला गणित कोण शिकवणार? यावर गंभीरपणे विचार सुरू असतानाच, वडिलांचे साहित्यिक मित्र मंडळी घरी येत असे आणि ‘आपले गणित चुकले’ हे मला त्या वयात ही कळावे, कांद्याची भजी , फक्कड चहा आणि कोट्यात्मक विनोदाच्या लाटा…कुठले गणित आणि कोणती किराणा यादी? सगळं वाहून जायी.

मला ही अभ्यासाचा जास्त पुळका नव्हता. त्यामुळे वडिलांचे बोट धरून मी ही निघायचे. कधी गंगेवर, कधी सार्वजनिक वाचनालय, कधी वसंत व्याख्यानमाला, कधी काळाराम, कधी गोंदेश्वर, तर कधी कविवर्य तात्यासाहेबांच्या घरी. 

काकासाहेब वि. वा. शिरवाडकर, त्यांच्या नाशिकच्या घरी तसे एकटेच रहात असत. मोठ्या मनाच्या या विभूतीच्या घरातील खोल्या तशा लहान होत्या आणि अंगणात मी खेळत असे. आजही मला त्यांची खुर्ची, टेबल, बुक रॅक आणि त्यांचा पलंग आठवतो. बाकी सगळं पुसट आठवतय. 

अशाच एका भेटीत मी ‘ध्यास’ कवितेवर कुसुमाग्रजांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. 

सर्वांचे लाडके तात्यासाहेब आठवणींची शिदोरी देऊन पलीकडच्या प्रवासावर निघून गेले.

काही वर्षांनंतर मी त्यांना आमच्या कॉलेजच्या “कुसुमाग्रज “ हॉल बाहेर लावलेल्या एका फोटोत पाहिले, आणि मला लहानपणचे ते शांत निवांत क्षण आठवले, वृक्षाच्या पानावरील दव अनुभवावा तसे स्मरण झाले. मोठी माणसे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्य जगायची व लढायची ऊर्जा देऊन जातात. 

साहित्य महर्षी विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब आज त्यांच्या जयंती निमित्ताने “मराठी भाषा गौरव दिन व विश्व मराठी साहित्य संमेलनानिमित्त” प्रकर्षाने आठवले. त्यांचा सहवास व आशीर्वाद लाभले हे भाग्य नसे थोडके.

“आमुच्या कुला कुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी”

बोलतो मराठी… जाणतो मराठी…मानतो मराठी









6 comments:

  1. छान लिहिले आहे Swati

    ReplyDelete
  2. खूपच मार्मिक आणि अचूक लिहिले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Dr. Swati Bhavsar27 February 2026 at 07:01

      धन्यवाद 🙏

      Delete
  3. छानच ग !

    ReplyDelete