काही माणसं ते स्वतः जे आहेत त्यापेक्षा कितीतरी वेगळी अशी आभासी प्रतिमा जगासमोर का उभी करतात? हा प्रश्न मला खुपदा पडतो आणि त्यांच्या सोबतची लोकं ही प्रभावित झाल्यासारखे दाखवतात, किंबहुना प्रभावित होत ही असतील.
एक विशिष्ट category ची माणसं, व्यासपीठावर किंवा दहा लोकांमध्ये असताना आदर्श वाटतात; पण प्रकाशझोतातून थोडे खाली उतरले की त्यांचं व्यक्तिमत्त्वं जणू पूर्णपणे बदलून जातं. मंचावर असताना त्यांची शब्दसंपदा अफाट असते, भाषा अत्यंत समृद्ध असते, आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो आणि व्यक्तिमत्त्वाची झळाळी सर्वांनाच भुरळ घालते. ते प्रेरणादायी भाषणं करतात, मिळालेल्या पुरस्कारांचा अभिमानाने उल्लेख करतात आणि आपल्या यशाचा देखावा सुंदर रेखाटतात.
पण व्यासपीठावरून खाली उतरताच चित्र बदलायला लागतं, रंग ही अनोळखी वाटू लागतात.
त्यांची वागणूक, देहबोली, बोलण्याची ढब, आवाजाचा सूर आणि शब्दांची निवड इतकी बदलते की समोरचा माणूस स्वतःलाच विचारू पाहतो,
"आत्ताच मायक्रोफोन हातात घेऊन इतकं प्रभावी बोलणारी व्यक्ती हीच आहे काय?"
मला यापेक्षाही अधिक आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं,
असं दुहेरी व्यक्तिमत्त्वं सतत जगण्यासाठी किती प्रचंड मानसिक ऊर्जा लागत असेल!
स्वतः आपण खरे कोण आहोत, लोकांसमोर स्वतःला कसं दाखवायचं आहे, या दोघांमधील अंतर किती आहे आणि ते अंतर कायम टिकवून ठेवण्यासाठी सतत स्वतःलाच आठवण करून देत राहणं, हा सगळा मानसिक व्यायाम किती दमवणारा असेल ना!
यासाठी केवढी स्मरणशक्ती, किती मानसिक ताकद आणि मेंदूतील पेशींचा किती तो विफल वापर होत असेल!
इतका मानसिक 'कार्डिओ' आपण नेमका कशासाठी करतो?
तोही अशा गोष्टीसाठी ज्याचा आपल्या मानसिक आरोग्याशी काहीही तसा सकारात्मक संबंध नाही आहे.
फक्त लोकांचं लक्ष वेधून घ्यावं, तेवढ्या त्या क्षणापुरते कौतुक मिळावं, टाळ्यांचा कडकडाट व्हावा, कानांना ते सुख मिळावे, लोकांनी आपल्याभोवती तेवढ्यापुरतं फिरावं, वा वा करावी….एवढ्यासाठी?
मित्रांनो, या टाळ्यांची किंमत मात्र फार मोठी असते बरंका!
जेव्हा आयुष्य हे एका अभिनयात बदलतं तेव्हा मनात कायम तुलना होत असते. आपल्यापेक्षा अधिक प्रभावी, अधिक यशस्वी, अधिक लोकप्रिय किंवा अधिक प्रसिद्ध अशी एखादी व्यक्ती नेहमीच असते. मग आपल्या प्रगतीचे मापदंड आपल्या स्वतःच्या प्रवासावर आधारित राहत नाहीत; ते इतरांच्या यशावर अवलंबून राहतात.
तिथून सुरू होतो एक न संपणारा त्रासदायक प्रवास,
सततची तुलना...
अबोल स्पर्धा...
स्वतःची प्रतिमा टिकवून ठेवण्याची धडपड...
आणि मानसिक थकवा.
त्याचा शेवट कशात होतो?
एका नव्या स्पर्धेत...
नव्या मापदंडात...
अस्वस्थेत...
आणि हळूहळू मनःशांती हरवत जाणाऱ्या आयुष्यात.
आपला मानसिक विकास, आपल्या ऊर्जेची दिशा कोणती आहे, यावर अवलंबून असतो.
जर हीच ऊर्जा आपण स्वतःच्या मूळ स्वभावाचं जतन करण्यासाठी आणि आपल्या आत दडलेल्या सकारात्मक गुणांना विकसित करण्यासाठी वापरली, तर त्याचे परिणाम कितीतरी अधिक समाधानकारक आणि लाभदायी असतील.
शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर, ऊर्जेचा तो वापर अधिक ऊर्जाक्षम (thermodynamically feasible) ठरेल.
आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, तो आपल्याला अधिक शांत, अधिक समाधानी आणि अधिक अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाईल.
मग प्रकाशझोतात असताना एक स्वभाव आणि प्रकाशझोतापासून दूर असताना दुसराच स्वभाव का?
आणि हा प्रश्न केवळ एखाद्या समारंभाचा किंवा मंचापुरता सीमित राहत नाही.
हा प्रश्न आहे आपल्या दररोजच्या 'मी'चा, आपल्या मूळ अस्तित्वाचा.
बहुधा म्हणूनच गुरुतुल्य माणसं सांगून गेली आहेत,
"सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 'मी' नावाचा प्रकल्प आहे."
स्वतःला पूर्णतः समजून घेणं, स्वतःवर सकारात्मक काम करणं आणि स्वतःचा स्वीकार करणं, यापेक्षा मोठी गुंतवणूक दुसरी कोणतीही असू शकत नाही.
आणि त्यानंतरच निसर्गाने आपल्यामध्ये गुंतवणूक केलेल्या ऊर्जेचा योग्य, सुजाण आणि अर्थपूर्ण नियोजन करून वापर होईल, ज्याला आपण “energy channelling” असं म्हणतो. महत्वाचे आहे की “सो हम” ची जाणीव करून घेऊन त्याला जपणे.

स्वाती अतिशय मार्मिक, सखोल आणि आजच्या काळातील एका मोठ्या मानसिक वास्तवावर बोट ठेवणारे मुद्दे तू मांडले आहेत. मला असे वाटते की माणसे दुटप्पी वागतात त्याला ३ कारणे आहेत (१) स्वतःचा ego satisfaction व त्यातून मिळणारा खोटा / तात्पुरता आनंद (२) सेल्फ protection / उघडे पडण्याची भीती कारण आपल्या तील कमतरता इतरांना कळू नयेत म्हणून (३) सुखाची चुकीची कल्पना
ReplyDelete