Friday, 3 May 2019

पूर्वग्रह दूषित मी...



आज collegeमधे supervision करत होते, पेपर सुरू होणार तोच एक मुलगा वर्गात आला. त्याने टोपी उलटी घातली होती, एका कानात बाळी होती, डावी भुवई संपते तिथे टोचलेले होते, गळ्यावर  टॅटू होता, टी शर्ट आणि फाटलेली जीन्स घातलेला, हा ऊंच पण बारीक अंगकाठीचा मुलगा, एखादा रॅप सिंगर यावा तसा येऊन बाकावर बसला. त्याला पाहताच माझ्या मनात विचारांची शाळा भरली. एकंदरीत मला असेच वाटले की हा आता स्वतः पेपर लिहीणार नाही आणि दुसर्यालाही लिहु देणार नाही. मनात असुरक्षिततेची भावना वाढली आणि मी पहारेकरासारखी त्याच्या जवळ जाऊन ऊभी राहिले. त्या मुलाने मात्र पेपर लिहीण्यासाठी मान जी खाली केली ती थेट पेपर संपल्यावरच वर केली, मला पेपर देताना. मी त्याच्या पेपरवर सही केली तेव्हा तो एकमेव मुलगा होता जो आदराने ऊभा राहिला होता. ह्या उलट वर्गाच्या दुसर्या कोपर्यात, चषमा लावलेला एक मुलगा होता, त्याने कपाळ्याच्या मधोमध भस्म लावला होता, चेक्सचा साधा शर्ट आणि सज्जन भासणारी त्याची चेहरे पट्टी होती. ह्या मुलाला मात्र मी २-३दा कॉपी करताना पकडले.
दिवसभराच्या माझ्या वागणुकीचे सिंहावलोकन  करण्याची सवय जर मला नसती तर माझा अंदाज चुकला हे माझ्या लक्षात आले नसते. प्रामाणिकपणा मनात असतो, संस्कारात असतो, म्हणुन तो वागणुकीत  झळकतो, वेशभूषेत नाही.
प्रसंग हा तसा किरकोळ आहे पण मी शिकले!
स्वाती